Wednesday 11 September 2019

निशब्दता....

न सुचणं म्हणजे अस्त वाटतो लेखणीच्या अस्मितेचा...काहीतरी सतत खात राहतं आतल्या-आत...मन विषण्ण होतं...
विचारांचं विवर खेचून घेतं आतल्या-आत..
नसतोच कुठेही कवडसा आशेचा..
त्या काळाशार विवरात प्रतिभेचा दिवा घेऊन चाचपडताना ठेचकाळतो पाय कुठेतरी 'घुसमटलेल्या भावनांना'...
सावरायला आधार घ्यावा तर कानांवर भस्सकन आदळतो आक्रोश..'अबोल व्यथांचा'...आणि धस्स होतं काळजातं...
आणि हो..हो.....नजरेला नजर भिडवून बघत असतात बरं 'मोडकळीस आलेली स्वप्न'...
नजर घ्यावी चोरुन पटकन आणि वळावं मागे..तर दृष्टीस पडतात 'विरक्त झालेल्या महत्वाकांक्षा'...कोपऱ्यात निपचित पहूडलेल्या...
कुठेतरी खोलवर...नकळत स्पर्श करुन जातात..'अताशा क्षणभ्रंगुर वाटू लागलेल्या आशा'....
अस्वस्थ होतात पाऊलं...त्या मळलेल्या वाटेवर...
घट्ट दाबून..कोंडून ठेवलेला अश्रुंचा बांध फुटतोच अखेर....
आणि त्या अश्रुंच्या धुक्यात डोळ्यासमोर नाचत राहतात...
'चुकलेले संदर्भ'..'विस्कटलेले अर्थ'..'हिरमुसलेल्या संवेदना'...'जीर्ण झालेली बेभान जिद्द'...'मन' सापडतं पुन्हा अनोळखी प्रश्नांच्या कचाट्यात...पुन्हा उडतो थरकाप...केविलवाणं धडपडतं‌ त्या काळोख्या विवरातून बाहेर येण्यासाठी....
मन पुन्हा होतं विषण्ण...आणि सरते शेवटी उरतो फक्त 'मरणासन्न कोरा कागद'...आणि 'जिवघेणी निशब्दता'.....

      -- अंतरा..
( कश्ती सलिम शेख)