Friday 8 June 2018

'फितूर'

ती... एक शांत तिन्हीसांज... आकाशाच्या अंगणात ढग दाटून आले होते अन मनाच्या अंगणात तुझ्या आठवणी....  त्या आठवणींचं विवर खूप खोल आहे.... म्हटलं त्यात बुडण्याआधी सावरायला हवं... नाहीतर श्वास घुसमटण्याची भीती... नेहमीचीच.... म्हणून मग पायात चपला सरकवल्या आणि निघाले ... वाट नेईल तिथे.... त्या एकट्या वाटेसोबत मीही एकटीच....
           पण.... मी एकटी पडलेले 'त्याला' आवडलं नाही कदाचित... मला सोबत देण्यासाठी 'तो' ही आला.... 'त्याचं' आणि माझं नातं फुलवणारा तो मृदगंध सोबत घेऊनच...
            त्या अल्लड थेंबांचा तो हळुवार स्पर्श.... तळहातावर ओघळणारे टपोरे मोती घेऊन मी चालत राहिले.... वाट नेईल तिथे... पण... आता एकटी नव्हते.... सोबतीला 'तो' होता अन त्याच्यात रमलेली मी....
          कडाडणारी वीजही शांत झाली आमच्या एकांताच्या चाहुलीने.... उरला फक्त काळोख...  ती वाट... अन शांतता....
            त्या एकांतात मग 'तोही' बरसला बेधुंद... बेभान वाऱ्याच्या हातांनी केसांशी खेळणं... अलगद बटांमध्ये गुरफटून जाणं... आणि 'त्याचा' तो स्पर्श... मोहवणारा... रिझवणारा.... अंगावर शहारा उठवणारा.. हे सगळं पुन्हा नव्याने अनुभवत होते...
आणि.... अचानक... कुठूनशी आलेली ती मंद झुळूक.... सर्वांगावर रोमांच उभे करून गेली.... आणि त्याक्षणी... त्याक्षणी तुझ्या मिठीतली ऊब हवीहवीशी वाटली.... पुन्हा तू... तुझी आठवण.... सावरण्याचे प्रयत्न करूनही बुडून गेले... तुझ्या आठवणींच्या विवरात....
           समजून चुकले.... कदाचित 'तोच' तुला 'फितूर' झाला....

                                                       -- अंतरा..
                                                ( कश्ती सलिम शेख.)
                                                  (   विशेष आभार  )
                                                         शिवाज्ञा..


18 comments: